मित्रहो,
'तिळगुळ घ्या, गोड बोला'
मध्यंतरी बरेच दिवस काही लिहिले नाही कारण घराचे रेनोव्हेशन करत होते. आता काम पूर्ण झाले त्यामुळे परत लिहायला सुरुवात केली आहे. मकर संक्रांत झाली, तिळगुळ खाऊन झाला आणि बऱ्याच मंडळींचे गुळाच्या पोळ्या पण खाऊन पोट भरले असेलच. गुळाची पोळी फक्त थंडीतच खाता येते कारण ती उष्ण असते, आणि इतर वेळी खाल्लेली पचणार नाही, तोंड येईल, उष्णता वाढेल असे त्रास होण्याची शक्यता असते.
त्यामुळे मी जे नेहमी माझ्या ब्लॉगमधून सांगत असते ते असे की भारतीय संस्कृती मध्ये सण,उत्सव आणि त्यावेळचा आहार ह्याचे नाते असते. ह्या उत्सवाचा आपल्या भावनिक, शारीरिक, सामाजिक, आणि इतर काही अध्यात्मिक, किंवा वैज्ञानिक घडामोडींशी संबंध असतो, आणि तो संबंध आपल्या त्या ऋतूतल्या आहारातून व्यक्त होतो.
संक्रांति च्या सुमारास पतंग उडविण्याचे कारण पण तसेच आहे. ह्यावेळी हवा छान असते, दुपारचे ऊन आल्हाददायक असते, म्हणून मग सगळ्यांनी पतंग उडवायचे, त्यासाठी गच्चीत किंवा मोकळ्या पटांगणात जायचे, वातावरणाचा मनसोक्त आनंद घ्यायचा, मजा करायची!
उंधियो, मिक्स भाज्यांचे पदार्थ, गरम गरम हलवा, खीर, गुलाबजाम अशा गोड पदार्थांचा भरपूर साजूक तूप घालून आस्वाद घ्यायचा, आणि मग भरपूर exercise पण करायचा आणि तब्येत उत्तम ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे!
संक्रांतीच्या आदल्या दिवशी 'भोगी' , भोगी च्या दिवशी घरातील अडगळीच्या, नको असलेल्या वस्तू फेकून देवून नवीन खरेदी करावी.म्हणजे जुने हेवेदावे, भांडणे,रुसवेफुगवे सोडून नव्याने प्रेम वाटावे हा संदेश! ह्या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत किंवा भाजी, आणि साधी तांदूळ_मुगडाळीची खिचडी करतात.
मकर संक्रांतीला तीळगुळाच्या वड्या, लाडू करतात.
ते तिळगुळ एकमेकांना देऊन "तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणण्याची प्रथा आहे. गुळाच्या पोळ्या भरपूर तूप घालून खाव्यात.
भरपूर रानमेवा म्हणजे बोरं, ऊस, मटार, हरबरा, गाजर, इत्यादी खावे. शिवाय सुकामेवा, चिक्की,गजक सारखे पदार्थ पण भरपूर खावेत.
आणि संक्रांत म्हटली की काटेरी हलवा आलाच! तीळ फोडून हलवा केला जातो. नंतर त्या हलव्याचे दागिने केले जातात आणि लहान मुलांचे बोरनहाण केले जाते!
म्हणजे छोट्या मुलांना काळ्या रंगाचे पण सुंदर सुंदर कपडे आणि हलव्याचे दागिने, मुकुट वगैरे घातला जातो, आणि त्याच्या डोक्यावर रानमेव्याचा पाऊस पाडतात! आणि त्याच्या ह्या बोरनहाणसाठी आलेल्या बालमित्रांना तो सर्व मेवा लुटू द्यायचा! काय मज्जा! पोरं खुश होतात अगदी!
नववधुंसाठी देखील ह्या सणाचे महत्व आहे बर का!
पहिल्या संक्रांतीला सुनेला हलव्याच्या दागिन्यांनी सजवतात, तिचे लाड पुरवतात! शिवाय त्यांना काही भेटवस्तू पण देतात.
संक्रांतीचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे 'संक्रांतीचे वाण' लुटणे! महिला वर्गाचा हा आवडता भाग! सवाष्णींना हळदी कुंकू, तिळगुळ, काटेरी हलवा आणि वस्तू 'वाण' म्हणून लुटायची! पुढे वर्षभर येणाऱ्या सुबत्ते साठी हे 'वाण' द्यायचे. ह्यात महिला चमचे, बाउल, रुमाल ह्या सारख्या छोट्या वस्तू, किंवा धान्याची पाकिटे, सुबक कुंकवाचे करंडे, किंवा अनेक विध वस्तू लुटतांना दिसतात. कल्पकतेने वाण देणे ही सुध्दा एक कला आहे.
पौष शुध्द चतुर्दशी म्हणजे मकर संक्रांत आणि संक्रांतीचा हा सण माघ शुध्द सप्तमी पर्यंत चालतो. म्हणजे बोरनहाण, हळदीकुंकू, वगैरे सर्व उत्सव ह्या २१ दिवसात केंव्हाही करता येतात.
संक्रांत स्पेशल
गुळाची पोळी ……
२ वाट्या बेसन कोरडे भाजून ठेवावे. १ वाटी गुल पाघळून घ्यावा. २ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून खसखस कोरडी भाजून घ्यावी, आणि भरड कुटावे. सर्व वस्तू एकत्र कराव्यात, त्यात वेलची पूड घालून सारण तयार करावे. गव्हाची कणिक तेल आणि किंचित मीठ घालून घट्ट मळून घ्यावी.
कणकेची छोटी गोळी घेऊन, उंडा करावा, सारण भरावे, आणि हलक्या हाताने पोळी लाटावी. तव्यावर भाजून घ्यावी . थंड झाली की पोळी कडक होते, ती थंडच खायची असते. पण खातांना भरपूर तूप घालून खावी.