Wednesday, 31 July 2013

PAVSACHI RIMZIM, SOBAT GARAM GARAM SNACKS!

एक जनाबने अख्बारमें इश्तेहार दिया____ 'बीवी चाहिये !''बिवी  चाहिये!' 
हर तरफसे आवाज आयी,'मेरी ले जाइये! मेरी ले जाइये!'

कालच ब्रेकफास्ट रेसिपीज   बाबत बोलत होतो, तर मला अचानक काही लिहून ठेवलेल्या रेसिपीज सापडल्या! बऱ्याचदा आपण काही   तरी शोधत असतो, अचानक काहीतरी सापडत! विस्मृतीत गेलेल्या  काही काही वस्तू, गोष्टी, टिपण, कागदपत्र असं  बरच काही सापडत आणि कधी कधी खूप आनंद होतो ते पाहून! तसच काहीस झालं माझं. कधी कधी तर असं  काही तरी सापडत कि अचानक धनलाभ झाल्या सारखं वाटत! तर माझ्या खजिन्यातल्या, अंड्याच्या ह्या दोन  रेसिपीज ……

versatile egg

१) एग रोल:  नेहमी प्रमाणे पनीर भुर्जी बनवून घ्यावी.   अंड्याचे ओमलेट तयार करावे, त्यावर सॉस  पसरून, पनीर भुर्जी मध्ये ठेवावी, ओमलेट रोल करावे. दोन तुकडे करून सर्व्ह करावे. हवे असल्यास चीज घालू शकतो.

२) एग उत्तप्पा:  २ अंडी फेटून घ्या. ४ ब्रेड स्लाईस पाण्यात soak करून, पाणी पिळून काढावे. अंडी आणि ब्रेड मिक्स करावे, मीठ आणि मिरेपूड, आणि थोडे दूध घालून batter  गुलगुलीत  करून घ्यावे.
कांदा,टोमेटो, हिरवी मिरची, कोथिंबीर मीठ एकत्र कालवून घ्यावे.

वरील batterचा जाडसर उत्तप्पा घालून,त्यावर  कांद्याचे मिश्रण पसरवावे. थोडे तेल  दोन्हीकडून घालून  भाजून घ्यावे आणि गरम सर्व्ह करावे. हवे असल्यास बटर घालावे. कांदा_टोमेटो ऐवजी उकडलेल्या मिक्स भाज्या पण घालता येतील, किंवा दोन्ही पण घालता येईल.

सध्या सतत पाउस पडत आहे, आणि हवेत एक  सुखद गारवा आहे, त्यामुळे गरमागरम,तळणीचे पदार्थ भरपूर होत आहेत. काल  कोथिंबीरची भजी केली होती. म्हणजे,actually, बटाटे वडे  केले होते…।


पण बेसन थोडं  उरलं, त्यात कोथिंबीर घातली आणि भजी तळून काढली!



तेवढ्यात घरी  कुणीतरी  पाहुणे आले म्हणून त्यांना भजी आणि केक दिला, पाहुणे खुश! बाहेर पाउस,आणि हातात गरमागरम भजी! आणिक काय पाहिजे?

मी सुरुवातीला  म्हटलं तसं, अचानक पाहुणे आले, कि आपलं  डोकं चालायला लागत,आणि अचानक काहीतरी पदार्थ आठवतो !  काहीतरी छान पदार्थ पट्कन तयार असला , आणि तो  त्यांना दिला ,  तर मला आनंद होतो!मला वाटत सर्वच गृहिणींना होत असणार, नक्कीच!   

  



Tuesday, 30 July 2013

ZATPAT BREAKFAST RECIPES

God saw man hungry, he created food,
God saw man thirsty,he created water,
God saw man lonely,he  created Friends,
God saw man with no problems, he created… WIFE !

बायको बद्दल काय काय कल्पना असतात ह्या नवरेमंडळींच्या! तरी बर बायकोच काळजी घेते ह्या नवरोबांची! नवऱ्याचीच नव्हे,तर घरातील सर्व सदस्यांचं  खाण _पिण, पथ्यपाणी, मूड्स, लहरी, अनेक demands, पै पाहुणा, सणवार, सर्व प्रकारे परिवार  मेन्टेन करण्याची जबाबदारी असते गृहिणीवर.

आता कालच शेजारीण म्हणत होती,'रोज रोज ब्रेकफास्टला काय करायचं प्रश्नच असतो बाई!' संध्याकाळी करण्यासाठी पदार्थ पण बरेच असतात आणि वेळ पण असतो. पण सकाळी घाई असते. हे  खरं आहे, पण थोडी पूर्व तयारी केली, तर ब्रेकफास्ट साठी पण बरेच सोपे पदार्थ करता येतात, आणि व्हरायटी पण  मेन्टेन करता येते. माझ्या काही हमखास रेसिपीज आहेत ज्या तुम्ही पण ट्राय  करून बघा.

१) पंचामृत डोसे: १ वाटी दूध,१/२ वाटी दही, १/२ वाटी साखर, २ टेबलस्पून तूप,२ टेबलस्पून मध एकत्र करून त्यात मावेल एवढी कणिक घालून डोसे बनवावेत. तूप घालून किंवा गरम दुधा बरोबर सर्व्ह करावेत/ टिफिन बॉक्स मध्ये foil  _wrap करून द्यावेत.

२) मिक्स डाळींचे डोसे किंवा pancakes: १ १/२ वाटी तांदूळ,१/२ वाटी उडद डाळ,१/४ वाटी प्रत्येकी मुगडाळ,मसूरडाळ,हरबराडाळ, आणि तुरडाळ.
 सर्व डाळी सकाळी भिजवून, संध्याकाळी बारीक वाटून ferment होण्यास ठेवाव्यात. सकाळी त्यात मीठ,हिरवी मिरची तुकडे,कोथिंबीर, आलं,आणि हवी  असल्यास हळद घालून डोसे किंवा pancakes बनवावेत. हे लंच बॉक्स मध्ये पण नेता येतात.

३) सिंधी सेवरी ब्रेड : १ वाटी टोमेटो प्युरी, आणि १/२ वाटी लसूण,कांदा,हिरवी मिरची,कोथिंबीर आणि पुदिना एकत्र वाटून तयार केलेली पेस्ट,हे साहित्य तयार ठेवावं.गार्निशसाठी शेव,लिंबू रस,कोथिंबीर. 
तेल गरम करून, टोमेटो  प्युरी घालून परतावी. लगेच हिरवी पेस्ट परतावी.मीठ तिखट घालून पातळसर ठेवावे.
सर्व्ह करताना, प्लेट मध्ये ब्रेडचे स्लाइस ठेवून,त्यावर हा तयार रस्सा ओतावा, वरून कोथिंबीर आणि लिंबू रस घालून द्यावे.
             

Monday, 29 July 2013

HOME MADE DISHES FROM READY TO EAT PACKETS

पार्वती: भगवन, आपका त्रिशूल कहाँ है?

शंकर: वह रजनीकांत लेकर गया है.

पार्वती: किसलिए?

शंकर: maggi  खाने  के  लिए !

Jokes  apart , maggi  आणि ह्यासारख्या Ready  to  eat  वस्तुंचा जमाना आता  आला आहे. इन्स्टंट  इडली,दोसा(सोबत आजकाल नारळाची चटणी पण मिळते!),उपमा,गुलाबजाम आणि असे बरेच कही!

शिवाय , तयार मसाले, मिक्स,पेस्ट,पण  बाजारात येत आहेत। बटर  पनीर मसालाचच  उदाहरण घ्या _ पनीर आणि बटर  घालायच, ही पेस्ट टाकायची की डिश  तयार! असे अनेक पदार्थ आहेत.

अर्थात, काही जुनी  मंडळी म्हणतील,"आम्ही नाही का पदार्थ केले घरीच? छानच होत होते की! "(ह्यात मी पण बऱ्या पैकी सामील बर का!)मी बरीचशी old  school  ऑफ thought  ची असले तरी, माझं  म्हणण  आहे की नवीन वस्तूंचा, नवीन technology चा वापर केलाच पाहिजे. म्हणजे मग नवीन  जमान्याबरोबर चालता येत. कधी कधी नवीन पिढीशी जुळवून घेण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या विचारांशी एकरूपता दाखवावी लागते, किंबहुना त्यांच्याशी एकरूप झालं तरच त्यांच्याशी संवाद साधता येतो! आणि मग generation  gap जी म्हणतात ती कमी करता येते.

अर्थात मी तर खूप खुश आहे ह्या नवीन products वर. एक तर वेळ वाचतो ,आणि नवीन काहीतरी करायला मिळत.  आणि ही  'झटपट' ची संकल्पना  तर फारच भारी आहे! तयारी म्हणाल तर काहीच नाही. सगळ झटपट! काही काही packet  तर ready  to  eat म्हणजे असे की  हे पाकीट गरम पाण्यात २ मिनिटच टाकायचं , आणि काढून लगेच सर्व्ह   करायचं! हे पदार्थ  खरच छान  लागतात. म्हणजे पाकिटातली  भाजी पानात आणि पोळी घेतली की जेवणाला सुरुवात! आतातर काय? पोळी सुद्धा पाकिटात तयार मिळते! मग काय प्रॉब्लेम  असू शकतो?

फक्त पोळीच नाही तर  पुरणपोळी, मांडे, ठेपले, म्हणाल ते packet मिळत !

But  all  said and  done, घरी केलेलं इडलीच पीठ,घरी केलेली पुरणपोळी, श्रीखंड ह्यांची चव काही निराळीच असते नाही? हे सर्व रेडी पदार्थ छोट्या कुटुंबात चालतील पण मोठ्या कुटुंबात पुरवठ्याला येत नाही. म्हणजे गृहिणीचे कसब पणाला लागतेच ना!

ह्याच packets  मधले पदार्थ वापरून मी काही काही पदार्थ तयार केले ते तुमच्या बरोबर share  करायचे आहेत.

१) नवरतन  कुर्मा : packet वर सांगितलेल्या भाज्या घ्यायच्या,कुर्मा  तयार करायचा. त्यात आधीच चिरून ठेवलेले मिक्स फ्रुट चे तुकडे घालून नीट  मिक्स करायचे, प्लेट मध्ये काढून वरून किसलेलं पनीर,खवा,टूटीफ्रूटी, काजू आणि बेदाणे, कोथिंबीर,असं सगळ घालायचं, म्हणजे हॉटेल  डिश  तयार होते कि नाही ते पहा!

२) कोफ्ता करी: गुलाबजाम च्या Packet वर सांगितल्या प्रमाणे गुलाबजाम करावेत. पंजाबी भाजीची ग्रेव्हीचे पण packet मिळते त्याप्रमाणे ग्रेव्ही बनवून त्यात हे गुलाबजाम सोडावेत, वरून पनीर,कोथिंबीर,कवा घालून  सर्व्ह करावी  कोफ्ता करी!

३) मलई मटर मेथी:  थोड्या तेलात मेथीची नाजूक पाने  डीपफ्राय करून घ्यावीत. मटार थोडे उकडून घ्यावेत. बटर पनीर मसाला चे packet  वर सांगितल्या प्रमाणे ग्रेव्ही करून,त्यात मेथी पाने आणि मटार घालून डिश सर्व्ह करावी.

४) मोमो / स्प्रिंग रोल /तिखट करंजी:  maggi  बनवून घ्यावी. त्यात थोड्या उकडलेल्या मिक्स भाज्या, कोथिंबीर चिली सॉस, टोमाटो सॉस,थोडे सोया सॉस  घालून सारण थंड  करून घ्यावे. हे सारण भरून मोमो, स्प्रिंगरोल,  तिखट करंजी  करावीत.

असेच प्रयोग करीत राहावे, म्हणजे रोज नवीन खाद्य पदार्थ गवसतो!

Happy  Cooking!










  

Saturday, 27 July 2013

PERFECT BAKING

' दिल दो किसी एक को ,
 प्यार करो किसी नेक को,
तब तक….  प्रपोस करते रहो हर एक  को !'

Perfect reciepe बनेपर्यंत बऱ्याच  वेळा चुकलेला पदार्थ संपवायची वेळ येते! Trial and error मधूनच  येते perfection! तोवर पदार्थ करीत राहायचं!

हे perfection येण्यासाठी आपण जेंव्हा एखादी रेसिपी वाचतो किंवा ऐकतो,तेंव्हा त्यातले पदार्थ,त्यांचे प्रत्येकाचे  मोजमाप,त्या पदार्थाचे गुणधर्म,आणि अंततः  तयार  होणाऱ्या पदार्थातील त्याचे प्रयोजन, हे सर्व काही  जाणून   घ्यायला हवे.  सर्व घटक जसे आहेत तसे हवेत, कि काही बदल करायचे हे ठरवून मग केलेला पदार्थ सहसा चुकत नाही.
 
केक बनवताना असं सुरुवातीला घडत .   आपण रेसिपीज  वाचत रहातो,  केक करायला घेतो, केक ,बिघडतो,आणि आपण धडपडत रहातो! पण, trial error नंतर एकदा का एक perfect मोजमाप सापडलं, कि मग मात्र केक  बिघडण्याची वेळ क्वचितच येते (तरी केक चुकतो बर का!) ingredients चे योग्य मोजमाप, केक साठी योग्य baking tray, योग्य tempreture, आणि ताजे  साहित्य हे सर्व  छान केक बनतो. केक तयार झाल्यावर जो सुवास येतो, bake म्हणून जो वर्णन शब्दात करणे अशक्यच!

मी पण perfect bake म्हणून जो केक करते, त्याची रेसिपी  देते आहे.

 
बेसिक केक :१२५ grms मैदा, १२५ grms बटर, १२५ grms पिठी साखर, २ मोठी किंवा ३ छोटी अंडी, १ tsp bk pwd, १/२tspसोडा, २ tbsp दूध(adjust), आणि १/४ tsp व्हानिला इसेन्स. सर्व साहित्य एकत्र करून whisk करून घ्यावे. (हे फूड प्रोसेसर मध्ये  पटकन होत) १८० डिग्री वर २० ते २५ मिनिटे बेक करावे.

चोकलेट केक:  वरील रेसिपी मधील २५ grm मैदा   कमी करून तेवढी कोको पावडर घालावी.

ह्याच साहित्याचे मफिन्स पण करता येतील.

एगलेस केक:   अंड्या ऐवजी १/२ कप दही घालायचे आणि केक बनवायचा.

आता microwave मधला एक केक:

मायक्रोवेव्ह मधील झटपट केक: 
केक साठी साहित्य : ३/४ कप मैदा,२  tbsp कोको पावडर, १/२ कप पिठी साखर, १ कप बटर/मलई/तेल,२ मोठी अंडी.
fondue सॉस साठी: १ कप पाणी,१/२ साखर,२ tbsp कोको पावडर.

कृती: केकचे साहित्य whisk करून  केक टीन मध्ये घालावे. fondue चे साहित्य pan मध्ये घेवून हलके उकळावे. केक च्या batterवर ओतून, micro ८०% वर ७ मिनिटे  बेक  करावा. (१ मिनिट कमी जास्त  होऊ शकत)्‌आ केक आतून थोडा ओलसरच राहिला पाहिजे.  फार छान लागतो.

 
Happy Baking!
 


         

Friday, 26 July 2013

SWAYAMPAAK AANI KASOTICHI VEL

काल सुरणाचे कबाब केले होते, yummy! नॉन व्हेज कबाबला टक्कर आहेत हे कबाब. सोया चंक्सचे कबाब पण असेच बनतात, एकदम मटन कबाब वाटतात.
सुरणाचे कबाब !

सुरण कबाबची रेसिपी शेअर करते आहे. जरूर करून बघा.
 
साहित्य: १ वाटी शिजवलेले  सुरण, १/२ वाटी बेसन, मीठ, २ टीस्पून तिखट,किंवा हिरवी मिरची ठेचा, ३ टीस्पून कोथिंबीर चिरलेली, थोडं आलंलसूण पेस्ट हवी असेल तर घालावी.
कृती:  सर्व साहित्य एकत्र करून नीट मळून घ्यावे. त्याचे कबाब करून डीफ्राय करावेत. हिरवी कोथिंबीर_पुदिना चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करावे.(लागले तर बेसन घालावे.)

आपण जेंव्हा ,स्वयंपाक करतो,तेंव्हा कधी कधी आपली कसोटीची वेळ येते हा अनुभव बऱ्याच वेळा येतो. दुसर कुणीतरी आपल्याला विचलित करायला बघत, कधी आपल्याला अवास्तव टीका ऐकावी लागते. पण आपण जर थोडसं स्वतःला ट्रेनिंग दिलं, तर आपण आपलं लक्ष विचलित न होऊ देता, आपलं काम चोख करू शकू, आणि ह्याचा फायदा आपल्यालाच होतो!
  
समर्थ रामदास स्वामी

इथे समर्थ रामदासांची एक गोष्ट सांगावीशी वाटते _ एकदा समर्थांच्या गुडघ्याला फोड किंवा गळू झाल. तर सगळे शिष्य आले आणि म्हणाले आम्ही तुमची सेवा काय करू? तर समर्थ म्हणाले,"हे गळू जे आहे, ते जर कुणी तोंडाने चोखले, तर ते गळू लगेच बर होईल. कोण करतय?" सगळे शिष्य एकमेकां कडे पाहू लागले. त्यांचा पट्ट शिष्य उभा राहिला आणि म्हणाला मी करेन हे काम. आणि त्याने गळू चोखायला  केली. आणि काही वेळातच तो अगदी खूष होऊन ते गळू चोखायला लागला! बाकीच्यांना काही कळेना, हा असा खूष का झालाय ते. काही  वेळाने त्याने इतर मित्रांना सांगितलं, "अरे,ते गळू नव्हतच मुळी! आंबा होता तो! किती रुचकर होता! म्हणून मी खूष होतो!"
हे होते कल्याणस्वामी ,समर्थांचे पट्ट शिष्य! अशी असते श्रद्धा!   अढळ, अविचलित श्रद्धा! अशीच श्रद्धा आपली आपल्या कामावर हवी,! मग आपण  प्रत्येक कसोटीवर खरे उतरतो!

काल चतुर्थीचा उपवास होता, वरई (भगर)  केली होती ती थोडी उरली, म्हणून मग त्यात अंदाजाने उकडलेले  बटाटे, थोडी उपवासाची भाजण, मीठ,मिरची, कोथिंबीर, घालून थालीपीठ  लावली, आणि काय बघता बघता संपली की!

भगरी पेक्षाही ही थालीपीठ जास्त रुचकर लागली ! कधी कधी उरलेल्या पदार्थातून केलेला नवीन पदार्थ हा  आधीच्या पदार्था पेक्षा जास्त रुचकर होतो, असा माझा अनुभव आहे.

मी शिळे अन्न शक्यतो त्याच स्वरूपात पुन्हा वाढायचं टाळतेच. त्याच रुपांतर करून नवीन पदार्थ पानात वाढला म्हणजे,खाणारा खुश, कुणाला कळतही नाही आणि खायला वेगळा पदार्थ पण तयार होतो! मला शिळ अन्न दिसलं की टेन्शन येत आणि मग नवीन पदार्थ लगेच सुचतो!

पण शक्यतो अन्न उरू नये ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या साठी जेवणाचा म्हणजे, जेवणारी मंडळी किती आणि काय काय जेवतील, ह्याचा अंदाज येण फार गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर १ वाटी साबुदाणा भिजवला तर २ ते२ १/२वाट्या खिचडी होते, किंवा १ वाटी तूरडाळ शिजवली तर ५ ते ६ वाट्या आमटी तयार होते.

happy cooking!
        
      

Wednesday, 24 July 2013

JEVNACHYAA PADDHTI AANI SHISHTACHAR

जेवण बनवण्याच्या, जेवण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या , मेजवानी प्रसंगी पाळायचे शिष्टाचार वेगवेगळे  ,बैठक व्यवस्था वेगळ्या वेगळ्या असतात. जेवणासाठी म्हणून खास वेशभूषा देखील  शिष्टाचारात येतात. शिवाय, जेवणा दरम्यानच्या संभाषणाचे देखील शिष्टाचार असतातच. आता हे शिष्टाचार त्या त्या प्रांताच्या भौगोलिक,सामाजिक, राजकीय,नैमित्तिक आणि इतर अनेक वेगवेगळ्या निकषांवर बेतलेले असतात. कालांतराने त्यामध्ये बदल देखील होत असतात.

आपल्याकडे पूर्वी चुलीवर लाकूड किंवा कोळसा वापरून  स्वयंपाक करण्याची पद्धत होती, आता ती fashion झाली आहे!  मातीच्या जमिनीवर बसावे,चुलीवरचे गरम गरम जेवण पत्रावळीत, हातांनी खावे,  हे सर्व त्याकाळी घराघरात व्हायचे,
तेच आज fashion म्हणून हॉटेल  मध्ये पैसे खर्च करून होते आहे!
आजच्या भाषेत सर्व  काही 'ईको फ्रेंडली' होते. सर्व साहित्य bio_degradable  होते! म्हणजे थोडक्यात, निसर्गाचे निसर्गाला परत! पर्यावरणाला धोका नाही!

 जेवणातील पदार्थ, त्यांची संख्या,त्यांची पाककृती, त्यात वापरल्या जाणारे  अन्न घटक, मसाले, हे सर्व काही वेगवेगळे! जेवणाला बसण्याची पद्धत,जेवण करण्याची पद्धत,वेगवेगळी!  म्हणजे  राजे,महाराजे  जेवणार,तर भल्या मोठ्या सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटात.

जेवणात विविध पदार्थांची रेलचेल, पंचपक्वान्ने, दुध दुभ्त्याच्या पदार्थांची मेजवानी असे! शिवाय पाना भोवती फुलांची आरास, रांगोळी,बसायला चौरंग, समोर चौरंगावर ताट, समई, सुवासिक उदबत्तीचा सुवास, आणि जेवण वाढायला वाढपी!

सात्विक जेवण















ब्राह्मण मंडळी जेवणाला सुरुवात करण्या आधी आणि शेवटून तुपाची आपोष्णी (म्हणजे  हात खोलगट करून,त्यात थोडेसे  तूप घेऊन ते प्यायचे. ) घ्यायचे. त्यांना बाकी सरंजामाची आवश्यकता नाही.

कष्टकरी लोक बहुतेक वेळा हातावर भाकरी भाजी,चटणी घेऊन खात, आणि त्यांची उकिडवे बसून खायची पद्धत आहे,ह्यावरून त्यांचा  सामाजिक दर्जा दिसून येत असे, कारण त्यांच्याकडे अन्न, वस्त्र,आणि निवारा सर्वच  बाबतीत कमतरता.

आत्ता मध्यंतरी tv वर  एका कार्यक्रमात एका आदिवासी घरातले जेवण दाखवले, त्या माणसाने  गुलमोहोराच्या फुलांच्या पाकळ्यांची  भाजी करून दाखवली!  मला फार आश्चर्य वाटले! म्हणजे निसर्ग जे देतो,त्यांतूनच माणूस  अन्न तयार करून खात आलेला आहे.  आणि निसर्ग माणसाला  तेच देतो जे त्या ऋतू मध्ये शरीराला मानवेल,मनाला भावेल, जिभेची तृप्ती करेल, सहज पचेल,आणि पोषक देखील ठरेल!  माणसाने मात्र निसर्गाच्या सूचनांना किंबहुना निसर्गालाच धाब्यावर बसवलेलं आहे,त्याच्या सूचनांचे  पालन करणे, त्याच्या ईशार्यांची दखल घेणे सोडूनच दिले आहे असे वाटते आहे. असो.

तर मी पाहिलेली गुलमोहोराच्या पाकळ्यांची भाजी _ खाली रेसिपी देत आहे.

साहित्य:  गुलमोहोर फुलाच्या पाकळ्या १ वाटी, १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा,१/२ वाटी चिरलेला टोमेट,  १ टीस्पून तिखट,मीठ,१ टीस्पून गरम मसाला,  तेल, मोहरी . 
कृती:  तेल गरम करून ,त्यात मोहरी घालावी, कांदा परतावा, टोमेटो तुकडे घालुन  परतावेत. तिखट,मीठ,गरम मसाला घालावा. नंतर गुलमोहोर च्या पाकळ्या टाकाव्यात. थोडे  परतावे. सर्व्ह करावे.
एकदम खेडवळ टच असलेली भाजी आहे. आजच्या भाषेत rusticfeel असलेली भाजी. कमीतकमी साहित्य आणि कमीतकमी वेळ ! मस्त!
  
              

Friday, 19 July 2013

RAMZAAN CHA PAVITR MAHINA

सध्या रमझानचा महिना चालू आहे. हिजरी दिनदर्शिकेप्रमाणे, हा नववा महिना. इस्लामी परंपरे प्रमाणे तसे  सगळेच  दिवस ,सगळेच  महिने शुभच असतात, परंतु  काही महिने निषिद्ध मानले आहेत ,आणि काही महिने,काही दिवस अतिशुभ असतात,असे मानले जाते. आणि  ह्या काळात केलेल्या पुण्यकर्मांचे फळ अनेक पटींनी चांगले मिळते! रमझान महिना हा अतिशुभ असल्यामुळे कल्याणकारी आणि आनंदमयी असतो , असे मानले जाते!

रमझान महिन्यात जास्तीत जास्त कुराण पठण  करावे,  नमाज पढावा, दानधर्म करावा, आणि संपूर्ण महिना 'रोजे' म्हणजे उपवास करावेत. सुर्योदयापूर्वी 'सेहरी' म्हणजे न्याहारी करतात आणि सुर्यास्ता नंतर रोजे सोडतात.  त्याआधी नमाजाचे पठण  केले जाते. संध्या काळच्या  जेवणात मात्र भरपूर पदार्थ  असतात, ज्यात मांसाहार असतोच.



काही काही ठिकाणी रोजे खोलण्यासाठी बाजारात अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल दिसते, आणि सर्व प्रकारचे लोक ह्या लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेतांना दिसतात.


 आपल्याकडे समाजाला देण्यासारखे काहीही असेल तर त्याचे दान करण्याचा महिना म्हणजे रमझान. पण हे  दान नेहमी 'सत्पात्री' असावं, असं  सांगितलं  जात. सत्पात्री म्हणजे ज्याचे दान देणार ते उत्तम,चांगले,उपयोगी  असावे,  शुद्ध अन्तःकरणाने हे दान केलेले असावे , आणि  ज्यांना  हे दान करणार ते ह्या दानासाठी पात्र किंवा योग्य असायला हवेत, त्यांना ह्या दानाचा लाभ व्हावा पण त्याच बरोबर त्यांना ह्या दानाची कदर असायला हवी. तरच हे  दान सफल झाले असे समजावे.दान हे पैशांचे,वस्तूंचे,ज्ञानाचे,अनुभवांचे,अनमोल विचारांचे आणि अशा   अनेक गोष्टींचे होऊ शकते, फक्त कल्पकतेची जोड हवी! गरजवंताची गरज भागते, आणि त्याच्या आशीर्वादाने दान करणाऱ्याला पुण्य मिळते!  

रमझान महिना हा उपवासाचा महिना आहे,तसेच अल्लाहचे आभार मानण्याचा पण आहे. अल्लाहने आपल्याला दिलेले 'बरकत' (म्हणजे समृद्धी,सौख्य) ,ह्या बद्दल त्याचे आभारही मानायचे, आणि त्याची 'मेहेरनझर' म्हणजे कृपादृष्टी अशीच राहावी  हे मागणे मागण्याचा महिना आहे रमझान.

'उपवास'ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणे उचित ठरेल. 'उप'म्हणजे जवळ, आणि 'वास' म्हणजे राहणे.'उपवास' म्हणजे परमेश्वराच्या जवळ रहाणे. भगवंताच्या सानिध्यात राहावे,चिंतन,भजन,कीर्तन,करावे, आणि अल्पसा आहार घ्यावा., म्हणजे उपवास. तर रमझानच्या पवित्र महिन्यात महिनाभर उपवास करतात ,आणि सुर्यास्तानंतर भोजन करतात, तेंव्हा ' इफ्तार'साठी समाजातील अनेक लोकांना, मित्र परिवाराला निमंत्रित करून, सहभोजनचा आनंद घेतला जातो.

रमझानच्या उपवासातून  शारीरिक, मानसिक, सामाजिक, धार्मिक,आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर माणूस सुद्दृढ, सक्षम, तेजस्वी, आणि प्रगतीशील बनतो. उपवासाने शरीराची शुद्धी होते,रोगमुक्त होण्याचा राजमार्ग मिळतो. उपवासात आहारावर नियंत्रण होते,आणि त्यातून माणूस संयम, स्वयंशिस्त,इंद्रियदमन शिकतो.  दान केल्याने , सहभोजन केल्याने बंधुभाव, प्रेम वाढते, आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागते. अनेक धार्मिक विधी केल्याने धार्मिक स्तरावर माणूस अधिक प्रगल्भ होतो. ह्या सर्व प्रवासातून जातांना आपली आध्यात्मिक प्रगती होते  हे काही वेगळे सांगायला नको. त्यातून समाजाची प्रगती हे अंतिम ध्येय साध्य व्हायला काहीच वेळ लागत नाही!

ईद मुबारक!

ईद उल फित्र म्हणजे ईद! रमादान  महिन्याचा सर्वात पवित्र आणि  आनंदाचा  दिवस! 'ईद मुबारक' म्हणत सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना भेटतात!अल्लाहच्या सेवेत खास नमाज अदा केली जाते. लहानांना मोठ्यांकडून 'ईदी' म्हणजे काही भेटवस्तू मिळते! ह्या ईदीचा मुलांना होणारा आनंद काही वेगळाच  असतो !
आता खास ईदसाठी बनवला जाणारा पदार्थ :

शामी  कबाब:  १ वाटी हरबरा डाळ  २ तास भिजवून नंतर निथळून घ्यावी. तेल गरम करून आलं, लसूण, मिरे,जिरे,लाल मिरची तुकडे घालून परतावे. नंतर १ वाटी मटण  खिमा परतावा. थोडे शिजले कि, हरबरा डाळ घालून परतावे.  नीट  शिजले कि,  कोरडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
हे मिश्रण, कोथिंबीर,पुदिना,हिरवी मिरची तुकडे,मीठ,तिखट,घालून घटत गोळे करून,त्याला कबाबचा आकार देऊन ,तेलात टाळून घ्यावेत. कोथिंबीर,पुदिना चटणी सोबत सर्व्ह करावे.  बिर्याणी सोबत चांगले लागते. .                         

Thursday, 18 July 2013

VAARKARI MHNJE ANANDYATRI

सध्या आषाढ महिना चालू आहे . आषाढ म्हणजे पंढरपूरच्या वारीचा महिना! लाखो वारकरी पंढरपूरला विठोबाच्या  दर्शनाला जातात. 'विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला 'म्हणत दिंड्या चाललेल्या असतात, पायी चालत, मुखी पांडुरंगाचे नाम, घेत घेत वारकरी अवघड वाट तुडवीत अनेक दिवसांचा  पायी प्रवास करीत पंढरपूरला पोहोचतात. हे सर्व कशासाठी? तर  विठ्ठलावरची असीम भक्ती,श्रद्धा, आणि विठू सर्व काही चांगलेच करेल, मंगल करेल ह्या विश्वासा पायी!
वारीला चाललीस ना? मग सर्व चिंता त्या विठूवर सोडून दे!

वारीला जाणाऱ्या  मंडळींमध्ये प्रेम,सदभाव, माणुसकी दिसतेच, शिवाय विठ्ठलाचे नामस्मरणाचा घोष करून आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या  ह्या भक्तीच्या सागरातून प्रचंड ऊर्जा,चैतन्य,  आणि स्फूर्ती मिळते! वारकरी म्हणजे आनंदयात्री!  एकदा विठ्ठलावर सगळी काळजी,विवंचना,सोडली कि तो वारीला जायला मोकळा! असा चिंतामुक्त वारकरी मग भजन,कीर्तन,प्रवचन,आदी मध्ये  अगदी रंगून जातो, आनंदमय होतो म्हणून तो आनंदयात्री!


पंढरपूरला जात असता ह्या वारीमध्ये अनेक दिंड्या सामील होत राहतात. काही मंडळी पूर्ण वारी करतात, काही जमेल तेवढे अंतर चालून पांडुरंगाची सेवा करतात,काही मंडळी जमेल तसे वाहनाने जाऊन दर्शन घेतात! सगळ्यांचा मार्ग वेगवेगळा असला, तरी अंतरीची आस मात्र एकच _त्या माउलीचे  दर्शन ! आणि मुखी नामघोष एकच 'जय जय विठल, जय हरी विठल!'आणि 'ग्यानबा तुकाराम  '
वारकर्याची दिंडी मुक्कामी विसावली

सावल्या विठ्ठला तुझ्या दारी आलो! विसरून गेलो देहभान!

आषाढी एकादशीला भक्तमंडळी आपल्या लाडक्या पांडुरंगाचे विठोबाचे  दर्शन घेवून  प्रसन्न मनाने आपापल्या घरी परततील. पण ह्या वेळी आठवण ठेवायला हवी ती ह्या वारकरी समुदायाच्या पाठीमागे खंबीरपणाने  उभ्या राहिलेल्या आणि त्यांना अनेक प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या मंडळींची!

ही वारी म्हणजे शिस्तबद्ध आखणी,नियोजन,आणि काटेकोर अंमलबजावणीचे, म्हणजेच ,आजच्या भाषेत management  चे पुस्तकच म्हणायला हवे! ह्या मंडळींनी  वारीचे नेटकेपणाने,काटेकोरपणे,वेळेचे बंधन पाळत, पूर्ण नियोजन केले. वारकर्यांना भोजन दिले, त्यांच्या विसाव्याची व्यवस्था, पालख्यांची,रिंगणांची, पूजेची, सर्व तयारी यथोचित ठेवली.वारीच्या मार्गावर वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन केले, वारकर्यांच्या सुरक्षे बाबत जागरूक राहिले. आरोग्य आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली.  अनेक छोट्या मोठ्या गरजांची,सोयींची दखल घेवून,  हि वारी थेट पंढरपुरापर्यंत  सुखाने,आनंदाने  व्हावी ह्यासाठी ह्या मंडळींनी अहोरात्र मेहनत घेतली! त्यांची पण   पांडुरंगाच्या चरणी ही  सेवाच नाही का?   अशा अनेकानेक संस्था,गावकरी मंडळी ,सुरक्षा यंत्रणा,आणि अनेक सामान्य नागरिक ह्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत. त्यांना ह्या वारीचे पुण्य मिळणारच!
पाऊले चालती पंढरीची वाट !सुखी संसाराची सोडुनिया गाठ!

ह्या  वारीमध्ये अनेक तरुण मंडळींचा सहभाग बघायला मिळाला, हि अत्यंत आनंदाची बाब आहे. ह्या तरुण मंडळींनी ही वारी तांत्रिक दृष्ट्या अधिकाधिक प्रगत करण्याचे स्वप्न पाहिले आहे, आणि हाच ध्यास घेऊन   त्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय  आणि प्रशंसनीय आहेत!

शेवटी म्हणावेसे वाटते कि, वारीचे बाह्य रूप कितीही बदलले, तरी, जोपर्यंत वारकर्यांचे हृदयात  विठूराया साठी प्रेम,भक्तिभाव, त्याला भेटण्याची तन्मयता आणि आस राहील, तोपर्यंत हि वारी, हि आनंदयात्रा अशीच शतकानुशतकं चालूच राहील!

"जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल! पुंडलीक वरदे हारी विठ्ठल! श्री नामदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराजकी जय!"

एक अगदी मराठमोळी न्याहरीचा पदार्थ: (शेतावर न्यायची शिदोरी!)  

ज्वारीचे धपाटे:1  वाटी ज्वारीचे पीठ घेवून,त्यात मीठ,तिखट,हिरवी मिरची,कोथिंबीर,थोडे तीळ,बारीक चिरून कांदा,हवी असल्यास हळद घालून, पीठ मळून त्याच्या भाकरी कराव्यात . फक्त भाजताना दोन्हीकडे तेल लाऊन भाजावी. सोबत लसूणचटणी,कांदा,आणि हवे असल्यास तूप द्यावे. हे धपाटे २ ते ३ दिवस टिकतात,त्यामुळे प्रवासास न्यायला उत्तम!

ह्यात थोडा बदल म्हणून _ वरील पिठात खुरासणीची चटणी, किंवा जवसाची चटणी घालून,सर्व बाकी साहित्य तेच ठेवून धपाटे करावेत.

                  

Wednesday, 17 July 2013

JEVAN BANVNYACHE SHASTR

अन्न तयार  म्हणजे स्वतःला तयार करणे, असे मी म्हटले  होते. ते कसं? जेंव्हा आपण स्वयंपाकघरात अन्न शिजवतो, तेंव्हा आपल्याला अनेक क्रियांमधून जावं  लागतं, हे तर आपण जाणतोच. सुरुवात होते ती स्वयंपाकघरातील स्वच्छते पासून . त्यानंतर आवश्यकते प्रमाणे जेवणाचे नियोजन करणे, त्यासाठी सामग्री एकत्रित करणे,विविध उपकरणे सज्ज करणे,त्यानंतर अंदाजा प्रमाणे अन्न्पदार्थाची जुळवाजुळव करणे, भाज्या,डाळी, मसाले,सर्व तयार ठेवणे. ह्यानंतर प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरुवात करणे!हा  हा स्वयंपाक दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याकडे कटाक्ष असायला हवा. अन्न योग्य आणि चांगल्या पद्धतीने शिजवलेलं  हवंच! 

तयार जेवण वाढण्यासाठी,बैठकीची  व्यवस्था योग्य असावी, ह्यासाठी येणारे पाहुणे,त्यांचा दर्जा,त्यांची आवड,त्यांच्या काही विशेष आवडी, ह्या सर्वांचा विचार केलेला हवा. जेवणासाठी वापरात येणारी भांडी, ही कोणती असावीत, त्यांचा दर्जा ह्याचा देखील विचार व्हावा लागतो. पंगत सुशोभित करणे पण तितकेच महत्वाचे असते. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे हसून स्वागत करून ,किंवा घरच्या लोकांना गोडीने बोलावून, जेवणास बसवावे आणि सुरु करण्यास सांगावे. अन्यथा, कधी कधी  पाहुणे रेंगाळलेले आढळून येते. आणि आता खरी परीक्षेची वेळ! म्हणजे पानात गरम,सकस,रुचकर,आणि ताज अन्न पाडाव!  प्रत्येकाने म्हटले पाहिजे 'अन्नदाता सुखी भवं'. 

आता हे सगळ करीत असताना  बघा, आपल्या लक्षात येईल कि आपण किती एकाग्रतेने,कल्पकतेची जोड देऊन, हे सर्व कार्य करीत होतो! ही एक प्रकारची साधनच नाही का?सगळ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेवून, पथ्यपाणी, अन्य विशिष्ट गरजा लक्षात ठेवून, स्वयंपाक करणे म्हणजे एक प्रकारची उपासनाच कि नाही? ह्या उपासनेतून आनंद तर मिळतोच,शिवाय समाधान लाभते! आणि हे सर्व करीत असताना जर मुखी नामस्मरण ठेवले, तर परमेश्वराची वेगळी उपासना करावीच लागत नाही!

आता असाच एक सात्विक मेनू…… 

मक्याच्या दाण्याची कढी:   १ वाटी मका दाणे  शिजवून,मिक्सर मधून वाटून,गाळून घ्यावे. ह्या पेस्ट मध्ये १/ ४ वाटी घोटलेले दही मिक्स करावे.तेल गरम करून मोहरी, जिर हिंग,लसूण, करीपत्ता, हिरवी मिरची तुकडे,लाल सुकी मिरची तुकडे,घालून नंतर मका पेस्ट घालावी. गरम झाले कि, मीठ,मिरेपूड,कोथिंबीर घालून  गरम गरम वाढावे.  ही कढी उकळू  नये.

सोबत भरलेल्या भेंडीची भाजी, आणि सोया परोठा द्यावा. 

सोया परोठा:१ बटाटा उकडून लगदा करावा. १ वाटी सोया granules  शिजवून घ्यावेत. तेल गरम करून कांदा,हिरवी मिरची,हिंग,घालून परतावे. नंतर बटाटा आणि सोया घालून परतावे. मीठ,गरम मसाला कोथिंबीर घालून मिक्स करून थंड करावे.पोळीच्या कोल्या मध्ये स्टफ करून परोठ करून भाजावा. तेल किंवा तूप हवे असल्यास घालावे. गरम परोठे लोण्या सोबत द्यावेत.   

   

Tuesday, 16 July 2013

SHAASTRA, DHARMA, AANI AAHAAR HYANCHA SAMBANDH

माझ्या ह्या ब्लॉग चे नावच 'food  is life ' आहे, त्यामुळे आता मी 'आपला आहार आणि आपले जीवन' ह्यांचा संबंध कसा आहे   हेच इथे सांगणार आहे, काही किस्से, काही रेसिपीज, काही माहिती च्या आधारे.
भोजन करणे म्हणजे फक्त 'पोट भरणे'  असं बरीच लोकं मानत असतात., पण असं म्हणण चुकीचं  आहे.  आहारशास्त्र सांगत की अन्नाचा प्रत्येक कण आपल्या शरीराला काही ना काही घटक देत  असतो_ चांगला अथवा अपायकारक . तेंव्हा प्रत्येक घास जपून खायला हवा कि नाही? समाजशास्त्र सांगत कि स्नेहभोजन केल्याने समाजातील सर्व घटकांमध्ये प्रेम, स्नेहभाव, आणि बंधुभाव  लागतो!  धर्मशास्त्र सांगत कि घरातील किंवा कुटुंबातील सर्वांनी मिळून,एकत्र बसून, हसत खेळत, आनंदाने भोजन केल्यास, संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहते, स्वास्थ्य लाभते, कुटुंबात जिव्हाळा, प्रेम, वाढून संबंध बळकट होतात, ज्यायोगे कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य प्रत्येकाच्या अंगी येते. अन्नाचे मानसशास्त्र देखील आहे बर का, कारण माणसाच्या मानसिक स्तिथीचा   आणि भोजनाचा गहिरा संबंध आहे , हे आपण रोजच बघतो, अनुभवतो देखील.

प्रत्येक धर्मात, भोजना पूर्वी त्या जगतनियंत्याला नमन करून,  त्याचे आभार मानण्याचा  रिवाज आहे हे आपण जाणतोच. शिवाय अन्नदान पण करण्याचा प्रघात आहे. ख्रिश्चन समाजात भोजन पूर्व  अशी prayer म्हणायचा रिवाज आहे कि…thank you  God  for  the  food we eat .

 हिंदू धर्मात अनेक ठिकाणी 'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म, उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. ' म्हणजे भोजन हा यज्ञ, आणि प्रत्येक घास ही यज्ञातील आहुती!   जेवण करण्यापूर्वी,ताटाच्या बाहेर,उजव्या बाजूला , अन्नाचे, वरून खाली, असे  पाच घास एकाखाली एक ठेवण्याची रीत आहे. ह्याचा अर्थ समजून घेतला तर फार नवल वाटेल, पण पटण्यासारखंच आहे. ह्यातला एकेक घास हा प्रत्येक देवतेला अर्पण केला जातो,'चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमदुताय स्वाहा, सर्वेभ्यो देवेभ्यो स्वाहा!'(चित्र,चित्रगुप्त,यम,यमदूत,आणि सर्व देवता) आणि त्यांना तृप्त केल्या नंतर आपण भोजन ग्रहण करतो. ताटाभोवती डावी कडून उजवी कडे पाण्याने तीनदा प्रोक्षण (पाणी उजव्या हातात घेवून ताटा भोवती गोलाकार घालणे ) करण्या मागे अर्थ हा कि  पूर्वीच्या मातीच्या जमिनी असल्याने कीड मुंगी ताटात येवू नये म्हणून हे पाणी, आणि अन्न!

मुस्लिम बांधवा मध्ये एकाच थाळीतून सर्वांनी एकत्र बसून भोजनाला सुरुवात करण्याची आणि त्याआधी प्रार्थना करून , 'बिस्मिल्लाह' म्हणण्याची पद्धत आहे.

बौद्ध बांधवा मध्ये 'झेन' गुरुंच्या म्हणण्या प्रमाणे स्वयंपाक करणे म्हणजे आत्मबोधाचा मार्गच आहे. आणि भोजना पूर्वी, हे भोजन आपल्यापर्यंत  पोहचविणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानण्याची रीत आहे!(शेतकऱ्या  पासून वाढप करणाऱ्या पर्यंत!) म्हणजे किती उदात्त विचार आहे बघा.

तर स्वयंपाक करणे हा अध्यात्मिक उन्नत्तीचा मार्ग आहे. कारण आध्यात्मिक उन्न्ती साठी जेवढी साधना,एकाग्रता,नियमित उपासना लागते, तितकीच पाकसिद्धी साठी लागते. पाकसिद्धी च्या साधनेतून एकमेकांसाठी प्रेमभाव, सहिष्णुता, आणि एकजूट वाढते आणि त्या परमात्म्याचे आशीर्वाद मिळतात ते वेगळेच! उत्तम अन्न तयार करणे म्हणजे स्वतःला तयार करणे, शुद्ध, सात्विक,परिपूर्ण आहार घेणे म्हणजेच स्वतःला शुद्ध,सात्विक,आणि परिपूर्ण करणे होय!

म्हणजे प्रपंच आणि परमार्थ, दोन्हीला जोडणारा दुआ म्हणजे आपले भोजन. तेंव्हा हा दुआ अगदी भक्कमच असायला हवा, होय ना?

हा दुआ भक्कम करण्याची सुरुवात एका  गोड पदार्थाने करूयात….

खव्याची पोळी: १ वाटी खवा कोरडा परतून घ्यावा. मिक्सर मधून गुळगुळीत करून घ्यावा. थंड झाल्यावर,त्यात १ वाटी पिठीसाखर, १ टीस्पून वेलची पूड ,१ टीस्पून भाजलेली खसखस पूड,घालून सारण तयारकरावे . साड्या पोळीची कणिक घेवून गोळी घ्यावी, सारण भरावे, पोळी लाटून,  तव्यावर तूप घालून   भाजावी.
 

NAVIN SHATAKAATLYAA AANKHEEN KAHEE AATHVANEE

happy golden anniversary!
बघता बघता नवीन शतकाची काही वर्ष संपली सुद्धा!   ह्या सरत्या दशकातला हा कार्यक्रम! आई बाबांचा लग्नाचा ५० वा वाढदिवस! ८ सप्टेंबर२००९ ला हा कार्यक्रम झाला…….
 

 अनेक सिनियर मन्डळी जमली होती, त्यामुळे छान झाला कार्यक्रम. अभिष्टचिंतनाचा नुसता वर्षाव!

आजी आजोबांचे अभिनंदन करताना निशांत आणि अनिकेत
मुल, नातवंड, नातेवाईक, सगळ्यांनी मिळून काही आठवणीना उजाळा दिला, काही मजेदार किस्से सांगितले, एकूण काय, तर धमाल केली!

 ५० ज्योतींनी ओवाळणी,वा!














५० ज्योतीं नी सवाष्णींनी ओवाळले, मोठ्यांनी आशीर्वाद दिले, लहानांनी आशीर्वाद घेतले!
असा साकारला आठवणीनचा कोलाज!

ह्या नंतर…….   _  आधी केक कापला ,नंतर फोटो ,आणि मग? मेजवानी! आणि  फोटो! ऑफ कोर्स!
























 ह्या कार्यक्रमा नंतर २७ जून २०१२ ला बाबांना ८१ वर्ष पूर्ण झाली म्हणून एक सहस्र्चन्द्रदर्शन सोहळा   करण्यात आला! हा पण  कार्यक्रम  बहारदार  झाला हे वेगळे सांगायला नको!  आधी सत्यविनायक पूजा झाली.


त्यानंतर होम हवन झाले.












नंतर थोडे देवदर्शन, आणि नंतर भटकंती!

 २१ ऑक्टोबर २०१०ला नवरात्रीत अष्टमी पूजा झाली. 

हा एक अनोखा कार्यक्रम होता. अतिशय सुंदर आणि सुबक असा  देवीचा मुखवटा बनवला जातो,
तिला साडी,चोळी,दाग दागिन्यांनी नटवले जाते, नैवेद्य दाखवला जातो.
 
आणि विशेष म्हणजे घागरी मध्ये धूप घेवून, घागरी फुंकल्या जातात. आई आणि बाबांनी घागर फुंकली, फार तेजस्वी वाटत होत ते दृश्य!

ह्या ही कार्यक्रमाला सर्वांची दमदार हजेरी होतीच!

३ फेब्रुवारी २० १३…। मी, भानुप्रिया, आई आणि बाबांचा जोधपूरला प्रमोदिनी कडे जाण्याचा एक मस्त योग जुळून आला! मुंबईहून जोधपूरची   flight  पकडायच्या आधी, आम्ही गिरगावात जिथे ब्रेकफास्ट करीत होतो, तिथून जवळच  बाबा लहान असताना रहात असलेली 'तारा बाग' ही बिल्डींग  होती. मग काय? आम्ही तिकडे जायचं ठरवलं. तिथे गेलो, ते आणि आमचे आजी आजोबा ज्या खोलीत रहात होते, ती खोली बघितली.
सर्व चाळ  जशीच्या तशीच आहे अजून!फक्त रंगरंगोटी नवीन आहे. आणि बाबांना तर  फारच  आनंद   झाला असणार हे नक्की, कारण ती   खोली सोडली, तेंव्हा ते फक्त आठ वर्षांचे होते पण त्यांना सर्व आठवत होते! मग आम्ही त्या खोलीत राहणाऱ्या  लोकांशी थोड बोललो, त्यांना हे सगळ सांगितलं , तर त्या बाई   पण खूष झाल्या, आणि जवळ जवळ ८० वर्षांनंतर कुणी व्यक्ती त्याचं जुन  घर पहायला येते,ह्याचं  त्यांना फार आश्चर्य वाटलं! फोटो  काढले, कारण हे म्हणजे सुवर्ण संधी होती, कारण  बाबां बरोबर त्यांची बायको , मुलगी आणि नात पण त्याचं लहानपणच घर बघायला एकत्र जमले होते!

असे हे आठवणींचे मणी  आपल्या आयुष्याच्या  माळेत गुंफतच राहणार!  पण आपल्यातून निघून गेलेल्या   सर्व आप्तेष्टांना,त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून,पुढच्या पर्वास सुरुवात करणार आहे.

 ह्यातील प्रत्येक व्यक्ती प्रिय होती,आणि प्रत्येकाने केलेल्या योगदानाने आपले जीवन समृद्ध झाले आहे, ह्याची प्रचीती त्या त्या वेळीच होते. कधी न कधी, कुठे न कुठे, कोणत्या तरी गोष्टी साठी कुणीतरी आठवतच!

तेंव्हा आपला हा आठवणींचा खजिना समृद्ध करायचा असेल तर, एकच करायचं, आपल्या सान्निध्यात येणार्या प्रत्येक व्यक्ती कडून चांगले घेत जावे!
सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःखम आप्नुयात