![]() |
| वारीला चाललीस ना? मग सर्व चिंता त्या विठूवर सोडून दे! |
वारीला जाणाऱ्या मंडळींमध्ये प्रेम,सदभाव, माणुसकी दिसतेच, शिवाय विठ्ठलाचे नामस्मरणाचा घोष करून आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या ह्या भक्तीच्या सागरातून प्रचंड ऊर्जा,चैतन्य, आणि स्फूर्ती मिळते! वारकरी म्हणजे आनंदयात्री! एकदा विठ्ठलावर सगळी काळजी,विवंचना,सोडली कि तो वारीला जायला मोकळा! असा चिंतामुक्त वारकरी मग भजन,कीर्तन,प्रवचन,आदी मध्ये अगदी रंगून जातो, आनंदमय होतो म्हणून तो आनंदयात्री!
पंढरपूरला जात असता ह्या वारीमध्ये अनेक दिंड्या सामील होत राहतात. काही मंडळी पूर्ण वारी करतात, काही जमेल तेवढे अंतर चालून पांडुरंगाची सेवा करतात,काही मंडळी जमेल तसे वाहनाने जाऊन दर्शन घेतात! सगळ्यांचा मार्ग वेगवेगळा असला, तरी अंतरीची आस मात्र एकच _त्या माउलीचे दर्शन ! आणि मुखी नामघोष एकच 'जय जय विठल, जय हरी विठल!'आणि 'ग्यानबा तुकाराम '
![]() |
| वारकर्याची दिंडी मुक्कामी विसावली |
![]() |
| सावल्या विठ्ठला तुझ्या दारी आलो! विसरून गेलो देहभान! |
आषाढी एकादशीला भक्तमंडळी आपल्या लाडक्या पांडुरंगाचे विठोबाचे दर्शन घेवून प्रसन्न मनाने आपापल्या घरी परततील. पण ह्या वेळी आठवण ठेवायला हवी ती ह्या वारकरी समुदायाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभ्या राहिलेल्या आणि त्यांना अनेक प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या मंडळींची!
ही वारी म्हणजे शिस्तबद्ध आखणी,नियोजन,आणि काटेकोर अंमलबजावणीचे, म्हणजेच ,आजच्या भाषेत management चे पुस्तकच म्हणायला हवे! ह्या मंडळींनी वारीचे नेटकेपणाने,काटेकोरपणे,वेळेचे बंधन पाळत, पूर्ण नियोजन केले. वारकर्यांना भोजन दिले, त्यांच्या विसाव्याची व्यवस्था, पालख्यांची,रिंगणांची, पूजेची, सर्व तयारी यथोचित ठेवली.वारीच्या मार्गावर वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन केले, वारकर्यांच्या सुरक्षे बाबत जागरूक राहिले. आरोग्य आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली. अनेक छोट्या मोठ्या गरजांची,सोयींची दखल घेवून, हि वारी थेट पंढरपुरापर्यंत सुखाने,आनंदाने व्हावी ह्यासाठी ह्या मंडळींनी अहोरात्र मेहनत घेतली! त्यांची पण पांडुरंगाच्या चरणी ही सेवाच नाही का? अशा अनेकानेक संस्था,गावकरी मंडळी ,सुरक्षा यंत्रणा,आणि अनेक सामान्य नागरिक ह्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत. त्यांना ह्या वारीचे पुण्य मिळणारच!
![]() |
| पाऊले चालती पंढरीची वाट !सुखी संसाराची सोडुनिया गाठ! |
ह्या वारीमध्ये अनेक तरुण मंडळींचा सहभाग बघायला मिळाला, हि अत्यंत आनंदाची बाब आहे. ह्या तरुण मंडळींनी ही वारी तांत्रिक दृष्ट्या अधिकाधिक प्रगत करण्याचे स्वप्न पाहिले आहे, आणि हाच ध्यास घेऊन त्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहेत!
शेवटी म्हणावेसे वाटते कि, वारीचे बाह्य रूप कितीही बदलले, तरी, जोपर्यंत वारकर्यांचे हृदयात विठूराया साठी प्रेम,भक्तिभाव, त्याला भेटण्याची तन्मयता आणि आस राहील, तोपर्यंत हि वारी, हि आनंदयात्रा अशीच शतकानुशतकं चालूच राहील!
"जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल! पुंडलीक वरदे हारी विठ्ठल! श्री नामदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराजकी जय!"
एक अगदी मराठमोळी न्याहरीचा पदार्थ: (शेतावर न्यायची शिदोरी!)
ज्वारीचे धपाटे:1 वाटी ज्वारीचे पीठ घेवून,त्यात मीठ,तिखट,हिरवी मिरची,कोथिंबीर,थोडे तीळ,बारीक चिरून कांदा,हवी असल्यास हळद घालून, पीठ मळून त्याच्या भाकरी कराव्यात . फक्त भाजताना दोन्हीकडे तेल लाऊन भाजावी. सोबत लसूणचटणी,कांदा,आणि हवे असल्यास तूप द्यावे. हे धपाटे २ ते ३ दिवस टिकतात,त्यामुळे प्रवासास न्यायला उत्तम!
ह्यात थोडा बदल म्हणून _ वरील पिठात खुरासणीची चटणी, किंवा जवसाची चटणी घालून,सर्व बाकी साहित्य तेच ठेवून धपाटे करावेत.






No comments:
Post a Comment