Wednesday, 21 August 2013

BHAIYYA MERE RAKHIKE BANDHAN KO NIBHANA

भैय्या मेरे राखीके बंधनको निभाना!

काल राखी पौर्णिमा होती. काही  ठिकाणी आज देखील राखी पौर्णिमा साजरी केली   जाते आहे . नारळी पौर्णिमा  हा   कोळी लोकांचा महत्वाचा  सण.  नारळ वाहून समुद्राची पूजा करतात, जेणे करून समुद्र   त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवेल, भरपूर सागरी संपत्ती देईल,  दरीयात जाऊन मासेमारी करणाऱ्या त्यांच्या जीवलागांचे रक्षण करेल, आणि त्यांची प्रगती  होत  राहील.  कोळी नृत्य करीत आनंद साजरा करतात.

मी डोलकर डोलकर, डोलकर दरियाचा राजा!

प्रत्येक भावाच्या हातावर आजच्या दिवशी राखी सजलीच पाहिजे. भाऊ बहिणींची, आणि बहिणी भावांची आतुरतेने  वाट पाहतात  तो दिवस! भावाला राखी बांधून, त्याचे औक्षण करून, एकमेकां मधला स्नेहभाव आणि प्रेम वृद्धिंगत होते! बहिणीला आवडणारी भेटवस्तू भाऊ आनंदाने तिच्या हातात देतो, तेंव्हा बहिणीला होणारा आनंद   बहिणीच जाणतात! (मनासारखं गिफ्ट मिळवण्यासाठी कधी कधी खूप मेहेनत देखील घ्यावी लागते बरं का! म्हणजे भावाला  मस्का वगैरे……  मारावा लागतो, काय करणार?)


नारळी पौर्णिमेला साखरभात करतात, पण  ह्या वर्षी  मी खुरचंदवडी केली होती.

'खुरचंद वडी'  ही नाशिकची स्पेशालिटी आहे.
त्यासाठी २५० ग्रॅम खवा, ६० ग्रॅम बेसन, ६० ग्रॅम बारीक रवा,वेगळे वेगळे भाजून घ्यावे, आणि मग एकत्र करावे. एकीकडे २५० ग्रॅम साखरेचा घट्ट म्हणजे २ तारी पाक करून,लगेच खव्यात ओतावा, आणि हे मिश्रण थोडा वेळ सतत ढवळत राहावे. घट्ट होत आले  की वेलची पूड घालावी. कडेने सुटायला सुरुवात झाली की  मग pan खाली उतरवून,घोटत राहावे, आणि गोळा झाला की तूप लावलेल्या थाळीत थापून द्यावे. हवे असल्यास  ह्या वडीत चारोळ्या,ड्राय फ्रुट चे तुकडे,घालता येतात.
नारळ घालायचा असल्यास,१ वाटी नारळाचा चव तसाच खवा,बेसन,आणि रव्याच्या मिश्रणात घालावा. पण मग ही वडी जास्त दिवस टिकत नाही हे लक्षात ठेवावे.


 वड्या  करायच्या म्हणजे मिश्रण शेवटी शेवटी घोटावे लागते, त्यासाठी फारच कष्ट असतात, म्हणजे हात  भरून येतात अगदी! पण मनासारख्या  वड्या  झाल्या, की  मग जो आनंद होतो, त्याची तुलना मनपसंत गिफ्ट मिळाल्या नंतर होणाऱ्या  आनंदाशी होऊ शकते!  

  


No comments:

Post a Comment