Saturday, 10 August 2013

NAGPANCHAMI CHA UTSAV

नरसोबा  आणि नाग
 उद्या नागपंचमी , नागाच्या पूजेचा दिवस! मातीचा नागोबा किंवा कुंकू अथवा गंधाने नऊ नागकुळे काढून(नऊ नागांची चित्र ) त्यांची पूजा करतात. किंवा नागनरसोबाची चित्र मिळतात, त्यातल्या नागोबाची  पूजा नागपंचमीला करतात.नागोबाच्या चांदीच्या टाकाची देखील पूजा करता येते.  मान्यता आहे, की, महिला नागोबाला आपला भाऊ मानतात, आणि त्याची पूजा करून, त्याला आपल्या मुलाबाळांचे, परिवाराचे   रक्षण करण्याचे साकडे घालतात. किती सुंदर विचार आहे हा!   त्या दिवशी भाजी चिरू  नये, चुलीवर तव्यावर काही पदार्थ करू नये, आणि कोणताही पदार्थ तळू नये अशी मान्यता आहे.  ह्या दिवशीचे पक्वान्न म्हणजे  'पुरणाचे दिंड'.

 पुरणाचे दिंड करण्यासाठी ……
१)पुरण भरून कारंजी बनवावी

२)  दोन्ही  कोन  जोडावेत
पुरणपोळीसाठी करतो ते पुरण तयार करावे. पोळीची कणिक भिजवून, एक छोटी गोळी घ्यावी, त्याची  पुरी लाटून, पुरण भरावे, आणि पुरीला फोल्ड करून करंजीसारखे करावे. त्यानंतर करंजीची दोन्ही टोकं हळूच वरती   घेवून   एकावर एक  दाबून घ्यावे. (मोमो सारखा आकार होतो.) हे दिंड कुकर मध्ये उकडून तुपा बरोबर सर्व्ह करावेत.





सोबत मिक्स भाज्यांची कोशिंबीर करावी….

कोबी, काकडी, बीट, सिमला मिरची, मुळा, गाजर, टोमेटो,  पालकाची पाने, अशा सर्व कच्च्या भाज्या बारीक   घेऊन,त्यात मीठ,,मिरेपूड,लिंबूरस, आणि कोथिंबीर घालून द्यावे.







 ३)असे दिसतात दिंड
 नागोबाचे दर्शन घ्यायचे, त्याची पूजा करायची, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा, आणि आपले रक्षण करण्याची प्रार्थना करायची!  ह्या प्रथेमागे शास्त्रीय कारण दिसून येते. नागोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे घरा बाहेर पडायचे, मैत्रिनी बरोबर रानावनात जायचे! म्हणजे मग मोकळ्या हवेत,  हिरव्या वनराईत,पावसात,  झोक्यांवर झोके घेतघेत, थट्टा मस्करी करीत, खेळ खेळायचे, झिम्मा फुगडी घालायची, नागोबाचे वारूळ शोधायचे,आणि नागोबा  दिसला, की मग त्याची पूजा करायची, म्हणजे सामुहिक आनंदोत्सवच साजरा होतो जणू! आणि चुलीवर तवा ठेवायचा नाही, भाजी चिरायची नाही,  हे सर्व नियम कशासाठी ? तर थोडक्यात सासुरवाशिणींना त्या दिवशी धार्मिक सणाच्या नावाखाली थोडी मोकळीक हो! ( आजकाल अनेक लोकं  ओरडा करतात की पूर्वीच्या बायकांना मुळी मोकळीकच नव्हती!)

म्हणजे बघा हं, शारीरिक स्वास्थ्य आणि उन्नत्ती, मानसिक आनंद ,  सामाजिक बांधिलकी, आणि  धार्मिक एकात्मता , अशा सर्वच स्तरांवर माणसाचा विकास घडवणारा सण! आणि नागाला मारू नये हा महत्वाचा  पर्यावरण संरक्षण संदेश पण   होता! पण हल्ली आपण काय म्हणतो? नागोबाला कसलं  पुजता? आणि हल्ली तर गारुडी नागोबाला  पकडून आणतात, त्यांना टोपलीत ठेऊन, सगळीकडे त्यांचा खेळ मांडतात, त्यांना काठीने ढोसून ढोसून टोपलीतून  बाहेर फणा काढून उभ करतात, त्यांना उपाशी देखील ठेवतात, कारण बायकांनी दिलेलं नागोबासाठीचं  दूध ते एका भांड्यात साठवतात हे मी स्वतः बघितलेलं आहे., (ते दूध  बहुधा ही   लोकचं पीत असतील)  असे हे हाल करून कोणती पूजा सफल होईल? कोणता देव प्रसन्न होईल? भूतदया हा हिंदू  धर्माचा पायाभूत संस्कार आहे, आणि ह्या सणातून हाच  संस्कार मनी रुजवला जातो.
 ह्याच नागनरसोबाच्या चित्रातल्या ' नरसोबा'ची पूजा चार शनिवारी करतात. नरसोबा म्हणजे नृसिंह, ज्यांनी हिरण्यकश्यपू चा वध केला. ह्या हिरण्यकश्यपूने शंकराकडे वर मागितला होता,  'मला ना  मनुष्य ना देवता वध  शकतील, ना रात्री मृत्यू येईल ना   दिवसा, ना  आकाशात मृत्यू ना   जमिनीवर, न कोणत्याही शस्त्राने,वा अस्त्राने, ना घराच्या आत, ना बाहेर, मला  कुठेही,  कसाही मृत्यू  येणार नाही. '  म्हणजे थोडक्यात अमरत्वाचे वरदान मागितले. पण मग मृत्यू अटळ आहे, त्यामुळे ह्या नरसिंहाचा, म्हणजे अर्धा नर आणि अर्धा सिंह असा अवतार धारण करून, भगवंताने ह्या राक्षसाचा वध संध्या समयी, त्याच्या घराच्या उंबरठ्यावर, स्वतःच्या मांडीवर त्याला घेवून, नखांनी  वार करून केला, म्हणजे त्याच्या  अटी पूर्ण झाल्या,  पण  त्याचा मृत्यू  मात्र टळला नाहीच. (  आपण देवाकडे  मागणं मागतांना सावधगिरी बाळगली पाहिजे! कारण मागे वळून  पाहतांना लक्षात  येतं, की,आपण जे  मागितलं  ते तर  देवानं दिलं, पण जे   मिळालंय, त्यात थोडं  आपण न मागितलेलं  पण आहे! आणि हे न मागितलेलं जे असतं, ते नेहमीच आपल्या आवडीचं असेल असं  नाही!)    

जिवत्या
 दर शुक्रवारी जीवत्यांची पूजा करतात.  मंगळवारी पण  केली तरी चालते. हल्ली जीवत्यांचे चित्र मिळते त्यावर आई आणि लहान  बाळांचे चित्र असते. मुलाबाळांच्या सुखरुपते साठी जीवत्यांची पूजा करण्याचा प्रघात आहे.  कसं  असत ना, आपण रोजच आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, पण हे सण आणि त्या निमित्ताने  होणारे विधी हे सांकेतिक असतात., हे लक्षात घेतलं, तर हे सणवार समजण सोपं होईल, नाहीतर उगीचच बाऊ केला जातो.

बुध आणि बृहस्पती
ह्यातल्या तिसऱ्या  चित्रात बुध आणि बृहस्पती ह्यांचे  चित्र आहे. तेंव्हा बुधाची  पूजा बुधवारी, आणि बृहस्पतीची गुरुवारी पूजा करायची.  थोडक्यात काय,प्रत्येक वारी, प्रत्येक देवाची पूजा होते!(शनिवार आणि रविवार सोडून) असो,  किती विचारपूर्वक ह्या सणांची रचना केली आहे,  हो ना?


आत्ताच माझ्या मुलीचा लहानपणीचा आवडता पदार्थ केला _ ब्रेडचा गोड उपमा! एकदम आठवण ताजी झाली! खूप आवडायची तिला हि डिश, पण आता आलेल्या नवीन पदार्थां मुळे थोडी  मागे पडली. But  many  dishes do   make me   nostalgic!

ब्रेडचा गोड उपमा
 



No comments:

Post a Comment