Monday, 12 August 2013

MANGALAGAURICHE MANGAL VRAT

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते!

उद्या अनेक नवविवाहित मुलींची मंगळागौरपूजा, जागर!  आणि त्या निमित्ताने , तिच्या माहेरी मैत्रिणींचा , सुवासिनींचा  मस्तपैकी घोळका जमणार! मग पूजा,आरती, जागर, खेळ,एकमेकींची थट्टा मस्करी,सुग्रास भोजन, नुसती धमाल!

मंगळागौरी ही पार्वती आहे,शिवाची शक्ती आहे, सौभाग्यलक्ष्मी आहे, आदिशक्ती आहे. आपल्याला  सर्व सुखे देणाऱ्या पतीचे कल्याण व्हावे, आयुष्य,आरोग्य,आणि ऐश्वर्य संपन्न व्हावे, तसेच माहेर आणि सासरचे पण  कल्याण व्हावे  ह्या हेतूने मुली हे व्रत ५ वर्ष भक्तिभावाने करतात

मंगळागौरीची एक कथा अशी पण आहे…।

उज्जैनीत एक वैश्य,त्याच्या बायको बरोबर राहत होता. त्याला पुत्र नव्हता,त्यामुळे ते  दुःखी होते. एका साधू  बाबांच्या सांगण्यावरून वैश्याने   देवीची आराधना केली.  देवीने विचारले, तुला दीर्घायुषी पुत्र हवा  असेल,तर तो जन्मांध होईल, आणि अल्पायुषी पुत्र   विद्वान असेल,तर तुझी इच्छा सांग. वैश्याने अल्पायुषी पुत्र मागितला, त्याप्रमाणे त्यास पुत्रप्राप्ती झाली.  पण साधूने  सांगितले होते की, तो काशीला जाऊन आल्याशिवाय  त्याचे  लग्न करू नका.

तेंव्हा त्याच्या मामा बरोबर त्याला काशीला पाठवण्यात आले. वाटेत  एका ठिकाणी मुक्काम  केला असता,त्या मामा_भाच्याला एका लग्नाला बोलावणे आले. मंडपात एक मुलगी तिच्या भांडणाऱ्या मैत्रिणींना सांगत होती, 'माझी आणि माझ्या आईची मंगळागौरीवर अपार श्रद्धा आहे,तेंव्हा माझे कधीच वाईट होणार नाही.' ह्या गुणी मुलीचेच लग्न होते,आणि नवरा मुलगा पळून गेला म्हणून लग्न थांबले! पण लग्न तर त्याच  मांडवात व्हायला हवे! मग योग्य वराचा शोध सुरु झाला, आणि हा मुलगा तिला पसंत   पडला, लग्न ही झाले!मामाला भाच्याचे अल्पायुषी असण्याचे गुपित माहित होते,त्यामुळे अशी श्रद्धाळू मुलगी  नक्कीच त्याचं  कल्याण करेल, असे त्याला वाटले,आणि तो  खुश झाला.

 नवरा बायको रात्री गौरीहरा जवळ झोपले होते. नवऱ्याला भूक लागली म्हणून तिने त्याला  लाडू दिले आणि ताट भेट म्हणून ठेवायला सांगितले. झोपेत, मुलीच्या स्वप्नात देवी आली आणि म्हणाली, 'तुझ्या  नवऱ्याला एक साप  दंश करायला आत्ता येईल, तेंव्हा नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तू त्या सपासाठी चांदीच्या वाटीत  दूध ठेव, आणि एक कऱ्हा रिकामा  ठेव. तो साप दूध पिउन, क्ऱ्ह्यात जाऊन बसेल. तू तो कऱ्हा तुझ्या चोळीने बंद कर आणि तुझ्या आईला दे. त्याप्रमाणे झाले, आणि आईला दिलेला कऱ्हा उघडून बघितला असता,त्यात सोन्याचा हार निघाला! आई  खुश झाली.सकाळी नवरा काशीला जाण्यास निघाला. जाताना त्याने बायकोला अंगठी भेट दिली.

काशीला गेल्यावर मुलगा खूप शिकला,पंडित झाला. पण मध्ये पाच वर्ष गेली,त्यामुळे मुलीचे आई वडील चिंता करीत होते. मुलगी म्हणाली, 'मी पाच वर्ष मनोभावे मंगळागौरीचे पूजन केले आहे, तेंव्हा माझे पती नक्की परत येतील, तुम्ही काळजी करू नका.'

इकडे मामा भाच्चे काशीत होते,आणि पाच वर्ष पूर्ण होत आली होती.  एके रात्री मुलाला  स्वप्नात दिसले, की त्याचा जीव घ्यायला यमदूत आले असता, देवीने त्या यमदूताचा वध केला आणि त्याचे प्राण वाचवले. हे मामला सांगितले असता,मामा बोलले,ही तुझ्या बायकोच्या मंगळागौरीवरच्या अपार श्रद्धेचेच फळ  आहे! आता आपण घरी जाऊ. ते मुलीच्या घरी परत आले.

त्या वेळी, मुलीच्या घरी मंगळागौरीचे पूजेचे उद्यापन सुरु होते. त्या दोघांनी मुलीची,आई वडलांची भेट घेतली,मुलीला ताट  दाखवले,तिने अंगठी दाखवली,ओळख पटली! सगळे खुश झाले! आणि पाहुणचार घेऊन तिघे उज्जैनीला परत निघाले.

उज्जैनीला आल्यावर मुलाचे आई वडील दोघांना पाहून खुश झाले! तेंव्हा तेच साधू महाराज तिथे आले,आणि सर्व पाहून आनंदित झाले. त्यांना मुलाच्या आईने भिक्षा घातली . ह्याच साधू बाबांनी, काही  वर्षापूर्वी , ती निपुत्रिक म्हणून तिच्या कडून भिक्षा घेण नाकारलं होत! पण त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना पुत्र प्राप्ती झाली होती.साधू बाबांनी सर्वांना आशीर्वाद दिला, आणि त्यानंतर  दोघे सुखाने नांदू लागले!    

मंगळागौरी आपल्या सर्वांना प्रसन्न व्हावी म्हणून हे व्रत! व्रताचे उद्यापन ५ वर्षांनी करतात,त्या वेळी आईला सोन्याच्या नागाची प्रतिमा,साडी_चोळी, वायन दिले जाते,  वडिलांचा पण आदर सत्कार केला जातो, आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.




No comments:

Post a Comment