Friday, 19 July 2013

RAMZAAN CHA PAVITR MAHINA

सध्या रमझानचा महिना चालू आहे. हिजरी दिनदर्शिकेप्रमाणे, हा नववा महिना. इस्लामी परंपरे प्रमाणे तसे  सगळेच  दिवस ,सगळेच  महिने शुभच असतात, परंतु  काही महिने निषिद्ध मानले आहेत ,आणि काही महिने,काही दिवस अतिशुभ असतात,असे मानले जाते. आणि  ह्या काळात केलेल्या पुण्यकर्मांचे फळ अनेक पटींनी चांगले मिळते! रमझान महिना हा अतिशुभ असल्यामुळे कल्याणकारी आणि आनंदमयी असतो , असे मानले जाते!

रमझान महिन्यात जास्तीत जास्त कुराण पठण  करावे,  नमाज पढावा, दानधर्म करावा, आणि संपूर्ण महिना 'रोजे' म्हणजे उपवास करावेत. सुर्योदयापूर्वी 'सेहरी' म्हणजे न्याहारी करतात आणि सुर्यास्ता नंतर रोजे सोडतात.  त्याआधी नमाजाचे पठण  केले जाते. संध्या काळच्या  जेवणात मात्र भरपूर पदार्थ  असतात, ज्यात मांसाहार असतोच.



काही काही ठिकाणी रोजे खोलण्यासाठी बाजारात अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल दिसते, आणि सर्व प्रकारचे लोक ह्या लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेतांना दिसतात.


 आपल्याकडे समाजाला देण्यासारखे काहीही असेल तर त्याचे दान करण्याचा महिना म्हणजे रमझान. पण हे  दान नेहमी 'सत्पात्री' असावं, असं  सांगितलं  जात. सत्पात्री म्हणजे ज्याचे दान देणार ते उत्तम,चांगले,उपयोगी  असावे,  शुद्ध अन्तःकरणाने हे दान केलेले असावे , आणि  ज्यांना  हे दान करणार ते ह्या दानासाठी पात्र किंवा योग्य असायला हवेत, त्यांना ह्या दानाचा लाभ व्हावा पण त्याच बरोबर त्यांना ह्या दानाची कदर असायला हवी. तरच हे  दान सफल झाले असे समजावे.दान हे पैशांचे,वस्तूंचे,ज्ञानाचे,अनुभवांचे,अनमोल विचारांचे आणि अशा   अनेक गोष्टींचे होऊ शकते, फक्त कल्पकतेची जोड हवी! गरजवंताची गरज भागते, आणि त्याच्या आशीर्वादाने दान करणाऱ्याला पुण्य मिळते!  

रमझान महिना हा उपवासाचा महिना आहे,तसेच अल्लाहचे आभार मानण्याचा पण आहे. अल्लाहने आपल्याला दिलेले 'बरकत' (म्हणजे समृद्धी,सौख्य) ,ह्या बद्दल त्याचे आभारही मानायचे, आणि त्याची 'मेहेरनझर' म्हणजे कृपादृष्टी अशीच राहावी  हे मागणे मागण्याचा महिना आहे रमझान.

'उपवास'ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणे उचित ठरेल. 'उप'म्हणजे जवळ, आणि 'वास' म्हणजे राहणे.'उपवास' म्हणजे परमेश्वराच्या जवळ रहाणे. भगवंताच्या सानिध्यात राहावे,चिंतन,भजन,कीर्तन,करावे, आणि अल्पसा आहार घ्यावा., म्हणजे उपवास. तर रमझानच्या पवित्र महिन्यात महिनाभर उपवास करतात ,आणि सुर्यास्तानंतर भोजन करतात, तेंव्हा ' इफ्तार'साठी समाजातील अनेक लोकांना, मित्र परिवाराला निमंत्रित करून, सहभोजनचा आनंद घेतला जातो.

रमझानच्या उपवासातून  शारीरिक, मानसिक, सामाजिक, धार्मिक,आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर माणूस सुद्दृढ, सक्षम, तेजस्वी, आणि प्रगतीशील बनतो. उपवासाने शरीराची शुद्धी होते,रोगमुक्त होण्याचा राजमार्ग मिळतो. उपवासात आहारावर नियंत्रण होते,आणि त्यातून माणूस संयम, स्वयंशिस्त,इंद्रियदमन शिकतो.  दान केल्याने , सहभोजन केल्याने बंधुभाव, प्रेम वाढते, आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागते. अनेक धार्मिक विधी केल्याने धार्मिक स्तरावर माणूस अधिक प्रगल्भ होतो. ह्या सर्व प्रवासातून जातांना आपली आध्यात्मिक प्रगती होते  हे काही वेगळे सांगायला नको. त्यातून समाजाची प्रगती हे अंतिम ध्येय साध्य व्हायला काहीच वेळ लागत नाही!

ईद मुबारक!

ईद उल फित्र म्हणजे ईद! रमादान  महिन्याचा सर्वात पवित्र आणि  आनंदाचा  दिवस! 'ईद मुबारक' म्हणत सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना भेटतात!अल्लाहच्या सेवेत खास नमाज अदा केली जाते. लहानांना मोठ्यांकडून 'ईदी' म्हणजे काही भेटवस्तू मिळते! ह्या ईदीचा मुलांना होणारा आनंद काही वेगळाच  असतो !
आता खास ईदसाठी बनवला जाणारा पदार्थ :

शामी  कबाब:  १ वाटी हरबरा डाळ  २ तास भिजवून नंतर निथळून घ्यावी. तेल गरम करून आलं, लसूण, मिरे,जिरे,लाल मिरची तुकडे घालून परतावे. नंतर १ वाटी मटण  खिमा परतावा. थोडे शिजले कि, हरबरा डाळ घालून परतावे.  नीट  शिजले कि,  कोरडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
हे मिश्रण, कोथिंबीर,पुदिना,हिरवी मिरची तुकडे,मीठ,तिखट,घालून घटत गोळे करून,त्याला कबाबचा आकार देऊन ,तेलात टाळून घ्यावेत. कोथिंबीर,पुदिना चटणी सोबत सर्व्ह करावे.  बिर्याणी सोबत चांगले लागते. .                         

1 comment: